मेहनत, जिद्द आणि यशाचा सुवर्ण अध्याय..!
गोंडपिपरीच्या वैष्णवी येलमुलेची तालुक्यात अव्वल झेप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
कन्या विद्यालयाचा दणदणीत निकाल
दहावीच्या निकालात गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय कामगिरी करत शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा संचालित कन्या विद्यालयातील वैष्णवी अजय येलमुले हिने तब्बल ९६ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिच्या या यशामुळे संपूर्ण गोंडपिपरी तालुक्याचा मान उंचावला आहे. अत्यंत शांत, अभ्यासू आणि जिद्दी स्वभावाच्या वैष्णवीने सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. शिवाजी विद्यालयाचा साहिल मांडरे याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर जनता विद्यालयाची प्रयोशी प्रदीप येल्लूरे हिने ९३.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळविले.
कन्या विद्यालय गोंडपिपरीने यावर्षी शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक गाठत तब्बल ९६.२२ टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यालयातील ५३ विद्यार्थिनी परीक्षा प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी ७ विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले, तर अनेक विद्यार्थिनी प्रथम आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीही योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकतात, हे या निकालातून पुन्हा सिद्ध झाले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थिनींची मेहनत यामुळे विद्यालयाने तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वैष्णवीच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण भसारकर तसेच सर्व शिक्षकांनी तिचे कौतुक करत “हे यश तिच्या अथक परिश्रमाचे फळ आहे,” अशी भावना व्यक्त केली. दुसरीकडे, प्रयोशी येल्लूरे हिच्या यशामुळे जनता विद्यालयातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक व पालकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या यशोगाथा प्रेरणादायी ठरत असून “परिस्थिती नाही, तर मेहनत आणि ध्येय मोठं असतं,” हा संदेश या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दिला आहे.


