हुमणी अळीच्या बंदोबस्तसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती चा अवलंब करा श्रीकांत पडघान
तुळजापूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान करणाऱ्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे कृषी विभागाच्या वतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत पडघान यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या प्रभावी नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना श्रीकांत पडघान म्हणाले की, “हुमणी अळी ही जमिनीतील कीड असल्याने ती पिकांच्या मुळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. याचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक औषधांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.”
तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर: करावा असे सांगितले,पावसाच्या पहिल्या मोठ्या सरीनंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. त्यांना नष्ट करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी प्रकाश सापळे (Light Traps) लावण्याचे आवाहन करण्यात आले.
शेतात ‘मेटारिझियम ॲनिसोपली’ यांसारख्या जैविक बुरशीचा वापर केल्यास हुमणी अळीचा नैसर्गिकरी्या नायनाट होतो. उन्हाळी नांगरट आणि आंतरमशागतीमुळे जमिनीतील अळ्या वर येतात, ज्यांना पक्षी वेचून खातात.
हुमणी अळीचे नियंत्रण हे एका शेतकऱ्याने करून चालत नाही, तर संपूर्ण गाव पातळीवर सामुदायिकरीत्या मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे पडघान यांनी पटवून दिले.
यावेळी तुळजापूर परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाने थेट बांधावर येऊन मार्गदर्शन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हुमणी अळीच्या प्रादुर्भावाबाबत काही शंका असल्यास त्वरित सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमामुळे आगामी खरीप हंगामात हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.



