महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सत्यशोधक समाजाचे आद्य प्रवर्तक थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशब्दाती जयंती सोहळ्याचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था भद्रावती तर्फे जयंतीचे औचित्य साधून महात्मा जोतिबांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य दोहतरे तर प्रमुख अतिथी म्हणून तज्ञ नगरसेवक राजेश बदखल, गुरुदेव विचार प्रचारक विशाल गावंडे, कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे अध्यक्ष मंगेश येरमे, जेष्ठ शिक्षक शरद राजूरकर, कला व साहित्य क्षेत्रातील रमेश खातखडे, आदी उपस्थित होते.
तत्कालीन काळातील बहुजन समाज व स्त्रियांच्या अधोगतीला, शोषणाला वाचा फोडून मागासवर्गीय व बहुजनांच्या विकासाकरिता आयुष्य वेचणारे जोतिबा फुले आजही तेवढेच प्रेरणादायी असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. तद्वतच जिथे ज्योतिबा तिथे सावित्री अर्थात स्त्री पुरुष समानतेचे उत्तम उदाहरण असल्याचे मत प्रबोधनकार विशाल गावंडे यांनी व्यक्त केले.
पुरोगामी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आमूलाग्र क्रांती घडविणारी फुले शाहू आंबेडकर यांची शिकवण आचरणात आणून दैववाद व कर्मकांड अश्या अनिष्ट व विकासाला अडसर ठरणाऱ्या प्रवृत्तीला तिलांजली देणे हीच खरी आदरांजली ठरेल असे मत राजेश बदखल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. लिमेश माणूसमारे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश येरमे यांनी मानले.
याप्रसंगी कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती सदस्यांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थिती होते.



