ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माराईपाटणच्या गंगामाता मंदिरासाठी १ कोटींचा निधी मंजूर

आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांचे फलित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- दुर्गम आणि आकांक्षित जिवती तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माराईपाटण येथील गंगामाता मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने १ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या निधीमुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामांना आता मोठी गती मिळणार असून, आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित मानले जात आहे.

माराईपाटण येथील गंगामाता मंदिराचे महत्त्व संपूर्ण जिल्ह्यात अनन्यसाधारण आहे. चंद्रपूरच्या माता महाकालीच्या यात्रेनंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी यात्रा म्हणून माराईपाटणच्या यात्रेची ओळख आहे. प्रतिवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र तसेच शेजारील तेलंगणा राज्यातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात. भाविकांची ही वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज होती.

आमदार देवराव भोंगळे यांनी या देवस्थानाचे महत्त्व ओळखून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. माराईपाटण येथे येणाऱ्या दर्शनार्थींसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची कामे या १ कोटींच्या निधीतून पूर्ण केली जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे दुर्गम भागातील या देवस्थानचा कायापालट होणार असून, जिवती तालुक्यातील पर्यटन आणि धार्मिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये