पुरुषी परंपरेला छेद देत जुळ्या बहिणींनी पार पाडले मातेचे अंत्यसंस्काराचे सोपस्कार
निधी व विधी या जुळ्या बहिणींच्या हस्ते मातेला मुखाग्नी प्रसंगी समुदाय भावनिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
समाजातील शतकानु शतके बाळगल्या जाणाऱ्या रूढी-परंपरांना छेद देत भद्रावतीतील झिंगुजी वार्ड येथील दोन जुळ्या बहिणींनी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारावेळी पुढाकार घेत स्वतः मुखाग्नी देत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. पारंपरिक समजुतीनुसार मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अंत्यसंस्कार विधीत पुत्राकडूनच अंत्यसंस्कार सोपस्कार पार पाडण्याची अलिखित परंपरा समाजात रूढ आहे. मुलगा नसेल तर चुलत मुलाला पुढाकार घ्यायला लाऊन परंपरा जोपासल्या जाते. मात्र या जुळ्या बहिणींनी मोठ्या धाडसाने व विरोधाला न जुमानता ही परंपरा मोडीत काढत आई प्रती आपले कर्तव्य पार पाडले.
हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या मृत आईचे नाव अनिता चंदन नागपुरे असे असून जुळ्या बहिणींचे नाव निधी चंदन नागपुरे व विधी चंदन नागपुरे असे आहेत.
अंत्ययात्रेदरम्यान दोन्ही बहिणी खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या होत्या. तिरडीपुढे स्वतः चालत संपूर्ण दाहसंस्कार विधीमध्ये सक्रिय सहभागी होत अंतिम समयी आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
या घटनेने उपस्थित नातेवाईक, जनसमुदाय, समाज अक्षरशः भावनिक झाला होता.
आप्त व समाज बांधवानी या धाडसाचे स्वागतच केले. प्रसंग दुःखद असला तरी स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने
चंदन नागपुरे हे साधारण मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून, पत्नीच्या निधनानंतर आता मुलींच्या संगोपनासह त्यांच्या विवाहाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर या जुळ्या बहिणींनी दाखवलेले धैर्य अधिकच प्रेरणादायी ठरत आहे.
समाजात मुलींनाही समान हक्क आणि जबाबदाऱ्या आहेत, याचा हा एक जिवंत संदेश असल्याची भावना व्यक्त होत आहे. बदलत्या काळानुसार स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे येत असून, अशा घटनांमुळे सामाजिक समतेचा मार्ग अधिक दृढ होत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.



