आक्सापूर _ चिंतलधाबा मार्गावर जुन्या डांबरावरच सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम
_निकृष्ट मुरूम, गिट्टी साहित्याचा वापर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
आक्सापूर–चिंतलधाबा मार्गावरील सुमारे सात किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम कयानस कंपनीकडून सुरू आहे. हे काम अंदाजे ५० कोटी रुपयांचे आहे. असे असतांना कुठलेही खोदकाम न करताच जुन्या डांबरवरच मुरूम व गिट्टी टाकून हे काम सुरू आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रश्न निर्माण होत आहे. सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करताना आवश्यक प्रक्रिया करूनच नियमानुसार काम न करताच जुन्या डांबर उखाळून रस्त्याचे खोदकाम करून मजबूत पाया तयार करणे अपेक्षित असते. मात्र या कामावर खोदकाम न करताच जुन्या डांबरावरच मातीमिश्रित मुरूम व निकृष्ट दर्जाची गीटी टाकून काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय बांधकामात वापरल्या जाणाऱ्या गिट्टीच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाचे मुरूम व गिट्टी वापरले जात असल्याने रस्ता टिकाऊ राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.
५० कोटी रुपयांच्या एवढ्या मोठ्या निधीतून होणाऱ्या कामात अशा प्रकारची निष्काळजीपणा होत असून संबंधित कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरी येथील अभियंता दिसून येत नसल्याचा आरोप केला जात असून सार्वजनिक पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी या क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे आणि संबंधित विभागाला पत्राद्वारे या संदर्भात तक्रार केली आहे. या कामाची संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून गुणवत्ता तपासावी आणि संबंधित कंपनीवर कारवाई करून मजबूत रस्ता बांधून द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
७ किलोमीटर सिमेंट काँक्रिट रोड सुरू असलेल्या आक्सापूर – चिंतलधाबा मार्गावरून रोज शेकडो सुरजागडच्या कच्च्या मालाची वाहतूक केली जाते. यामुळे हा रोड दर्जेदार होण्याची गरज आहे. असे असताना या मार्गावर काम करणाऱ्या कंपनीकडून चालढकल काम होताना दिसून येत आहे.
हे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते. गोंडपिपरी आणि पोंभुर्णा तालुक्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. पोंभुर्णा तालुक्याचे नेतृत्व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार करीत आहेत तर गोंडपिपरी तालुक्याचे नेतृत्व देवराव भोंगळे करीत आहेत. दोनही आमदार सत्ता पक्षातील असल्यामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम होण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
आक्सापूर चिंतलधाबा या सात किमी मार्गाचे काम कयानस कंपनीकडून सुरू असून ज्या ठिकाणी उंच भाग आहे त्या ठिकाणी दीड फूट खोदकाम करण्याचे सांगितले आहे. लेवल असलेल्या ठिकाणी डांबराचे खोदकाम करूनच मुरूम टाकून पुढील काम करायचे सांगितले आहे. नियमानुसार काम न केल्यास चौकशी करून सदर कंपनीवर कार्यवाही केली जाईल.
सुनील कुबडे,उपविभागीय, अभियंता,सार्वजनिक बांधकाम उपविभाग,गोंडपिपरी



