जागतिक क्षयरोगदिनी अधिपरिचारिका सविता गजानन गेडाम यांचा सत्कार
निक्षय मित्र बनून केले आहार किटचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
निक्षय मित्र योजना ही भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत एक पुढाकार आहे, ज्याद्वारे नागरिक, स्वयंसेवी संस्था किंवा कॉर्पोरेट्स टीबी (क्षयरोग) रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार, आर्थिक सहाय्य आणि मानसिक आधार देऊ शकतात. या योजनेंतर्गत टीबी रुग्णांना उपचारादरम्यान ६ महिने ते ३ वर्षांपर्यंत मदतीचा कालावधी निवडता येतो. सामाजिक बांधिलकी चे भान ठेवत अस्तित्व बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेणारे श्री गजानन भिकाजी गेडाम संस्थापक अध्यक्ष आणि सविता गजानन गेडाम सहसचिव यांनी निक्षय मित्र बनत सहकाऱ्यांना निक्षय मित्र बनविले ज्यात शुभ्रा बैद्य अधिपरिचारिका, भावना धाईत अधिपरिचारिका, श्रीमती शालिनी कुमरे (निंबारते) सेवानिवृत्त परिसेविका यांचा समावेश असून ५ क्षयरोग रुग्णांना ६ महिन्या करीता दत्तक घेत त्यांना उच्च प्रथिन युक्त आहार किट दिली. यावेळी डॉ. शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. छाया उईके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ मनीष मेश्राम भिषक वर्ग १, डॉ बागराज धुर्वे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ), गणेश खडसे यांचेसह जिल्हा जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
अस्तित्व संस्था ही समाजसेवा, आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक असे उपक्रम राबवत असते. ज्यात रक्तदान शिबीर आयोजन, कॅन्सर जनजागृती कार्यक्रम, मोफत रोगनिदान आणि मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन असे अनेक कार्यक्रम घेत असतात हे विशेष.



