पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते पवनार येथे उजास ग्रीन पॅड युनिटचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, उमेद, वर्धिनी व क्षितीज महिला प्रभाग संघाच्या संयुक्त विद्यमाने पवनार येथील महिला बचतगट भवन येथे उजास ग्रीन पॅड युनीट सुरु करण्यात आले आहे. या युनिटचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. या युनिटमध्ये बचतगटातील महिलांना रोजगार तसेच उत्पन्नाचे चांगले साधन उपलब्ध होणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या महाव्यवस्थापक पुनम पाटकर, पुनम ढोबळे, महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शितल भोयर, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक निरज नखाते, क्षितीज प्रभाग संघाच्या अध्यक्ष सिमा ठाकूर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथमच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून बचतगट भवन येथे पुर्ववापर युक्त सॅनेटरी पॅड युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटमुळे प्रभागातील बचत गटातील महिलांना खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी मिळणार आहे. युनिटमुळे आता बचतभवनचा समावेश उद्योगामध्ये झाला आहे. यामुळे उमेदच्या चळवळीला मोठे यश मिळणार आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
राज्यातील महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी व त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद मॉल तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विदर्भात वर्धा येथे 20 कोटी रुपये खर्च करुन उमेद मॉल तयार करण्यात येणार आहे. या मॉलमध्ये उमेदचे सर्व उत्पादन ग्राहकांना मिळणार आहे. यामुळे बचत गटाच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे. यासाठी बचत गटांनी बाजारातील उत्पादित मालाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी मालाचे पॅकेजिंग, मार्केटींगवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
प्रभाग संघाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या या उजास ग्रीन पॅडची पहिली ऑर्डर महिला शिक्षण संस्थेने द्यावी अशी आशा यावेळी महिला शिक्षण संस्थेकडून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुनम पाटकर यांनी आदित्य बिर्ला एज्युकेशन प्रकल्पामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ट्रस्टच्यावतीने शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन बाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून सद्या ट्रस्टच्यावतीने तयार करण्यात येत असलेल्या रसायनमुक्त सॅनेटरी पॅडच्या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते उजास ग्रीन पॅड युनीटचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभाग संघातील बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



