ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील अंतुर्ला गावच्या रेवा कौरासेची ‘बिग बॉस मराठी-6’ मध्ये निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          जिल्ह्यातील अंतुर्ला (ता. भद्रावती) येथील सामान्य कुटुंबातील कु. रेवा विठ्ठल कौरासे हिची १ मार्च २०२६ (रविवार) पासून बिग बॉस मराठी सिझन-६ मध्ये स्पर्धक म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातून या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये प्रथमच संधी मिळाल्याने जिल्ह्यात आनंद व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

रेवा कौरासे हिचा जन्म २५ डिसेंबर १९९८ रोजी अंतुर्ला या छोट्या गावात झाला. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा विसापूर येथे, तर माध्यमिक शिक्षण जि. प. हायस्कूल भद्रावती येथे झाले. पुढे तिने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथून बी.ई. (इलेक्ट्रिकल) पदवी प्राप्त केली.

करिअर घडविण्याच्या उद्देशाने रेवा २०१९ पासून मुंबई येथे कार्यरत आहे. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात तिने विविध स्पर्धा व प्रकल्पांमध्ये काम केले असून ‘मिस ऑरा – फेस ऑफ इंडिया २०१९’ तसेच ‘मिस इंडिया ग्लोब २०१८’ हे किताब मिळविले. तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘सीता मनोहर राघव’ या तेलुगू चित्रपटातही भूमिका साकारली आहे. विविध नामांकित ब्रँड्ससाठी रॅम्प वॉक, जाहिराती, होर्डिंग्स व ब्रँड शूट्समध्येही तिचा सहभाग राहिला आहे. तिला गायन, नृत्य, पोहणे व वाचनाची आवड असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आहे.

सध्या रेवा मुंबई येथे वास्तव्यास असून तिचे आई-वडील भद्रावती शहरातील एकता नगर येथे राहतात. तिच्या या यशाबद्दल शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी-6’ हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनी व जिओ हॉटस्टार अॅपवर प्रेक्षकांना पाहता येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी रेवाला विविध माध्यमांतून प्रोत्साहन व शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये