घुग्घुसच्या चिंतामणी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एबीसी आयडी कार्यशाळा
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त - प्रा. डॉ. श्रावण बाणासुरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
घुग्घुस येथील चिंतामणी महाविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान – पीएम उषा) यांच्या संयुक्त विद्यमाने अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) आयडी नोंदणी, गुण हस्तांतरण व अंमलबजावणी” या महत्त्वाच्या विषयांवर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली . संस्थेचे आद्य संस्थापक स्व. प्राचार्य वसंतरावजी दोन्तुलवार व वैभव दोन्तुलवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एम. आसुटकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. श्रावण बाणासुरे (इंग्रजी विभाग प्रमुख, कला वाणिज्य महिला महाविद्यालय, बल्लारपूर) , तसेच समन्वयक डॉ. नितीन कावडकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि डॉ. माधव कांडणगिरे, मराठी विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितिन कावडकर यांनी केले .
डॉ. श्रावण बाणासुरे यांनी नोंदणी प्रक्रिया, गुण हस्तांतरणाची पद्धत व अंमलबजावणीतील तांत्रिक बाबींसंबंधी मार्गदर्शन केले . नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय आसुटकर यांनी ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स’मुळे विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाची संधी उपलब्ध होत असून ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणारी महत्त्वपूर्ण पायरी असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेसाठी विविध विद्यापीठांतील ११६ विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. गणेश सुरजुसे यांनी केले तर डॉ. नितिन कावडकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



