मौजा नांदगाव–जुनगाव मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
डांबरीकरणाची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा नांदगाव ते जुनगाव या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात मुरूम टाकण्यात आल्यामुळे वाहनचालकांना वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत श्री. विनोद बालाजी मारशेट्टीवार (रा. देवाडा बुज, पो. बोर्डा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) यांनी उपविभागीय बांधकाम विभाग, पोंभुर्णा यांना लेखी अर्ज देऊन रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे, नांदगाव ते जुनगाव हा सुमारे ७ किलोमीटरचा मार्ग असून या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर रेतीच्या गाड्या मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे. खड्ड्यांमध्ये मुरूम टाकल्यामुळे वाहने घसरतात तसेच धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यांना व आरोग्यालाही त्रास होत आहे.
म्हणून संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जाची प्रत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात आली असून या मागणीला परिसरातील नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला आहे.



