समर्थ कृषी महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अन्तर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे नशामुक्त भारत अभियानांतर्गत एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार कांबळे पोलीस उपनिरीक्षक आणि चंद्रकांत साळवे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितिन मेहेत्रे व प्रा. विकास म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. नितिन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले. तंबाखू, दारू, गांजा तसेच कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन न करण्याचा तसेच त्यांचे उत्पादन व प्रसार टाळण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे त्यांनी आवाहन केले. व्यसनमुक्त समाज निर्माण झाल्यास कौटुंबिक व सामाजिक पातळीवर सकारात्मक बदल घडून येतील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात असताना मादक पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शिक्षणासोबतच उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. व्यसनांची सवय लागल्यास आजचे व उद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि त्याचा परिणाम कुटुंब व समाजावरही होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या कार्यक्रमामध्ये नशा मुक्ती पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विकास म्हस्के यांनी केले. या कार्यशाळेला स्वयंसेवक, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच महाविद्यालयातील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



