१०२ रुग्णवाहिका चालक चक्काजाम करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
१०२ रुग्णवाहिकेवर ०८ ते १० वर्ष विनाखंड सेवा केलेल्या वाहन चालकांना जिल्हा परिषदेत सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी २३ फेब्रुवारीपासून चालक कामबंद आंदोलन करून चक्काजाम करणार असल्याचा इशारा चंद्रपूर जिल्हा 102 रुग्णवाहिका वाहन चालक अध्यक्ष उमेश गोलेपल्लीवार यांनी दिला आहे.
रुग्णवाहिकेवरील चालक हे नित्यनेमाने सेवा देत आहेत. वेळ, काळ न पहाता सेवा दिली आहे. त्यामुळे एवढे दिवस सेवा देऊनही या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्यासाठी काहीही हालचाली केल्या जात नाहीत.
आकृतीबंध आराखड्यामध्ये रुग्णवाहिका चालकाचे पद मान्य असतांना त्या पदाचा लाभ दिला जात नाही. एनएचएम मधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले आहे, तर मग रुग्णवाहिका चालकांबाबत दुजाभाव का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्येष्ठतेनुसार विनाखंड सेवा दिलेल्या चालकांना जिल्हा परिषदेअंतर्गत सामवावे अन्यथा २३ फेब्रुवारीपासून १०२ रुग्णवाहिका बंद करण्याचा इशारा चंद्रपूर जिल्हा 102 रुग्णवाहिका अध्यक्ष उमेश गोलेपल्लीवार यांनी दिला आला आहे.



