देवलागुडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- देवलागुडा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि समाजाच्या एकतेच्या वातावरणात यशस्वीरित्या साजरी झाली. समाजातील बंधू-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने हा सोहळा अधिकच उत्साहपूर्ण आणि स्मरणीय ठरला. संत सेवालाल महाराज हे मानवतावादी, समाजसुधारक आणि बंजारा समाजाचे थोर संत असून, त्यांच्या शिकवणी आजही समाजाला दिशा देत आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणेदार प्रविण जाधव (जिवती), गोर सेना जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार, इंदल आडे, सुदाम राठोड, मेहबूब शेख यांच्यासह गावाचे नायक अशोक जाधव, सरपंच सुनिता किशन जाधव, रामचंद्र चव्हाण उपस्थित राहिले. त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रमेश राठोड यांनी प्रास्ताविकातून मोलाचे विचार मांडले.विकास चव्हाण यांनी प्रभावी आणि सुंदर संचालन करून कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. दत्ता चव्हाण यांनी मनापासून आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यात कैलास जाधव, विकास चव्हाण, दत्ता चव्हाण, पवन जाधव, कैलास पवार, अंबादास जाधव, रामेश्वर राठोड, प्रेम किशन राठोड, राहुल जाधव, माजी उपसरपंच प्रेमदास राठोड तसेच इतर सर्व बंजारा बांधव-भगिनींनी अमूल्य सहकार्य आणि परिश्रम केले. बंजारा उत्सव समितीच्या वतीने सर्व मान्यवर, कार्यकर्ते आणि उपस्थित समाजबांधवांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत. आपल्या प्रेम, सहभाग आणि एकजुटीमुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.



