राज्यस्तरावर चमकली लखमापूरची विद्यार्थिनी ज्योत्स्ना मडावी
राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथील विद्यार्थिनी कु. ज्योत्स्ना मडावी हिने राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. दि. ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोपरगाव येथे आयोजित राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने गोळाफेक (शॉटपुट) प्रकारात सहभाग नोंदवला.
तालुका आणि जिल्हास्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत तिने राज्यस्तरापर्यंत यशस्वी मजल मारली. राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही तिने आत्मविश्वास, जिद्द आणि उत्कृष्ट खेळ कौशल्याचे दर्शन घडवत उल्लेखनीय कामगिरी साकारली.
अदानी सिमेंटच्या सी . एस.आर.उपक्रमांतर्गत अंबुजा फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या क्रीडा प्रोत्साहन कार्यक्रमाचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे. त्याच कार्यक्रमाच्या मार्गदर्शनातून ज्योत्स्ना मडावी हिला राज्यस्तरावर गोळाफेक प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळाली.
ज्योत्स्नाच्या यशामागे अंबुजा फाऊंडेशनचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षकांचे परिश्रम, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे प्रोत्साहन तसेच पालकांचा मोलाचा पाठिंबा लाभला आहे. तिच्या या यशामुळे शाळा व संपूर्ण गाव परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी तिचे मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



