कंपन्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – अमित बोरकर
प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : उसगाव मार्गावरील पॉवर प्लांट तसेच घुग्घुसजवळील मेटल अँड एनर्जी लिमिटेडमुळे परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत घुग्घुस नगरपरिषद, संबंधित उद्योग आणि प्रशासन यांनी संयुक्तपणे ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित बोरकर यांनी केली आहे. संयुक्त प्रयत्नांमुळे परिसरातील पर्यावरणीय परिस्थिती सुधारण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
या संयुक्त उपक्रमांतर्गत वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियमित पर्यावरणीय ऑडिट, धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाय, सांडपाणी व्यवस्थापन तसेच नागरिकांसाठी पर्यावरण जागरूकता कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,” अशी ठाम भूमिका घेत घुग्घुस नगरपरिषदेने उद्योगांकडून जबाबदारी निश्चित करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले. या प्रयत्नांमुळे घुग्घुस परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता उंचावेल आणि नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी गणेश उईके, प्रणयकुमार बंडी, बबलू सोमेश्वर मुंडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



