ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अशोक रेचनकर यांची नियुक्ती

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी; तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक रेचनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीमुळे गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशोक रेचनकर यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीनंतर गोंडपिपरी तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास, बूथस्तरावर पक्ष विस्तार करण्यास तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाला बळकटी देण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले

अशोक रेचनकर यांच्या निवडीबद्दल चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार, तसेच गोंडपिपरी तालुक्यातील देवेंद्र बट्टे, तुकाराम झाडे, देविदास सातपुते, राजू झाडे, नितीन पेदुलवार, महेंद्र कुनघाडकर, सिनू कंदनुरीवार, सारनाथ बक्षी, रफीक शेख, साईनाथ कोडापे, नामदेव सांगडे, राजेश डोंगरे, सोनी दिवसे, पायल दुर्गे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम करणे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे आणि पक्षाची विचारधारा गावागावात पोहोचविणे, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहील,” अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये