पाथरी पोलिसांच्या जाळ्यात दारू तस्कर
देशी दारूच्या २० पेट्या सहित कार जप्त ; परवानाधारक दुकानावर कारवाई होणार का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली – पाथरी पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीत कारमध्ये देशी दारूच्या २० पेट्या वाहतूक करतांना पकडण्यात आले. या कारवाईत अंतरगाव येथील दारू तस्कर रमेश राजू ताडपल्लीवार याचेवर कारवाई करण्यात आली. मात्र दारू पुरवठा करणाऱ्या परवानाधारक दुकानदारावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत मौजा मेहा (बुज) गावाजवळील गोसी खुर्द नहराजवळ नाकाबंदी दरम्यान एक चारचाकी वाहन मारुती कार (एम एच २९-जे -०४४८)पोलिसांनी थांबवली. थांबवण्यात आले. तपासात या वाहनामध्ये २० बॉक्समध्ये भरलेली ९० एम.एल.च्या देशी दारूच्या २००० बाटल्या आढळून आल्या. सदर कारवाईत दारू तस्करावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये झाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर यांनी केलं असून त्यांच्या टीममध्ये पोउपनि खोब्रागडे, सफौ यशवंत कोसमशिले, पोअं बळीराम बारेकर, प्रविण कोवे, अमित म्हस्के, गजेंद्र डेंगळे, खेलेश कोरे, मपोअं शोभना सुरे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
नवनियुक्त ठाणेदारांनी पहिल्याच दिवशी कारवाई केल्याने कौतुक
पाथरीचे नवनियुक्त ठाणेदार नितेश डोर्लीकर यांनी रुजू होताच पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे तर अवैद्य दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तीन गावे सोडली तर सर्व गावात अवैद्य दारुविक्री केल्या जात आहे. मात्र नवनियुक्त ठाणेदार यांनी याच पद्धतीची दबंगगिरी कायम ठेवावी. नाहीतर तत्कालीन ठाणेदारांसारखे अवैद्य धंदे करणाऱ्यांसोबत साटेलोटे करून परंपरा कायम ठेऊ नये ही अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत.
परवानाधारक दारू दुकानावर कारवाई करावी
सदर कारवाईतील आरोपीने ज्या परवानाप्राप्त दारू दुकानातून किरकोळ विक्रीची परवानगी असतांना मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा केला आहे त्या दारू दुकानावर कारवाई करावी. जेणेकरून परिसरात दारूचा पुरवठा होणार नाही.