घुग्घुस पोलिस व R.K. मदनी कंपनीची कठोर कारवाई
दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड सुरू, बेकायदेशीर अतिक्रमण हटवले

चांदा ब्लास्ट
घुग्घुस – सोमवार, २ जून २०२५ रोजी घुग्घुस परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ट्रॅफिक अडथळे आणि बेकायदेशीर अतिक्रमणाच्या समस्येला तात्पुरता दिलासा देणारी महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. घुग्घुस पोलिस आणि R.K. मदनी कंपनी यांच्या संयुक्त पुढाकाराने दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी ते खुले करण्यात आले.
कारवाईच्या वेळी सकाळपासूनच पोलिस आणि कंपनीचे अधिकारी घटनास्थळी सक्रीय होते. अतिक्रमणामध्ये येणारे जड वाहन, टायर, भंगार सामग्री आणि इतर अडथळे हटवण्यात आले. पेट्रोल पंपासमोरील एका वाहनावर नियमभंगाबद्दल दंडात्मक चालानही करण्यात आले.
या कारवाईत घुग्घुस पोलीस ठाण्याचे एपीआय योगेश पाटील, एएसआय विनोद लोखंडे, पोलीस हवालदार इस्माईल पठाण, नवाज सय्यद, मंगेश नागरकर, चंद्रभान घोडमारे तसेच R.K. मदनी कंपनीकडून अतुल बोटकर, सत्यजित सिंह, निशाल कात्रे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
एपीआय योगेश पाटील यांनी सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून पुलियाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक एकाच दिशेने सुरू होती. आता काम चालू असले तरी दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत, यामुळे ट्रॅफिक समस्येत दिलासा मिळेल. अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील.”
माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर आणि निरीक्षक तांड्रा यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांना वाहतुकीत मिळणाऱ्या सोयीसाठी प्रशासनाचे आभार मानले. त्यांनी हेही सुचवले की, बायपास मार्गावरही अशाच प्रकारची कारवाई करून अपघातांचे प्रमाण कमी करता येईल.
ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी ट्रॅफिक नियमांचे पालन करावे आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरून परिसरात सुटसुटीत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था टिकवता येईल.
या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात आले असून, प्रशासनाच्या या पावलांचे स्वागत करण्यात आले आहे.