ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करंजी-खराळपेठ रस्त्यावरील पुलाचे उद्या भूमिपूजन 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते शुभारंभ

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : करंजी ते खराळपेठ या राष्ट्रीय महामार्ग 353 बी वरील बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या पुलाचे भूमिपूजन उद्या, गुरुवार दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – III अंतर्गत मंजूर झालेल्या या पुलाच्या बांधकामासाठी 181.47 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 32.300 मीटर लांबीचा हा पूल गोडपिंपरी तालुक्यातील करंजी आणि खराळपेठ या दोन महत्त्वाच्या गावांमधील वाहतूक अधिक सुलभ करणार आहे.

या कामाचे भूमिपूजन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. भूमिपूजन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव भोगळे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित राहणार आहेत. या भागातील नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून, अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी आता पूर्णत्वास येत आहे.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या प्रकल्पाबद्दल बोलताना सांगितले की, “या पुलाच्या बांधकामामुळे करंजी आणि खराळपेठ परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पावसाळ्यामध्ये अनेकदा या मार्गावरील वाहतूक ठप्प होते, त्यामुळे या पुलाचे बांधकाम तातडीने होणे गरजेचे होते. या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा मला विशेष आनंद आहे.”

या भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये