महर्षी कर्वे यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात उत्सव साजरा
महर्षी कर्वे जयंतीनिमित्त शिक्षण, समता आणि सन्मानाचा संकल्प

चांदा ब्लास्ट
– “महर्षींच्या स्मरणातून शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवू” – डॉ. वेदानंद अलमस्त
– महर्षींच्या कार्याला उजाळा — जयंतीनिमित्त स्त्रीशिक्षणाचा जागर
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे भारतरत्न डॉ.महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६७ वी जयंती दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी कर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याला अभिवादन करत स्त्री शिक्षण व सक्षमीकरणासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख अतिथींच्या भाषणांमध्ये महर्षी कर्वे यांच्या समाजसुधारणेतील भरीव योगदानाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या एकांकिकेमधून त्यांच्या जीवनातील संघर्ष, महिलांच्या सक्षमीकरणासाठीची तळमळ आणि प्रयत्न प्रभावीपणे मांडण्यात आले. तसेच महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित लघु ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरणाद्वारे विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यात आली.
या कार्यक्रमाला आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची विशेष उपस्थिती लाभली.
“महर्षींच्या स्मरणातून शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवू” या प्रेरणादायी शब्दांत डॉ. वेदानंद अलमस्त यांनी महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थिनींना शिक्षण व सक्षमीकरणाची दिशा दिली. तसेच सर्व उपस्थितांना स्त्रीशक्तीच्या प्रबळतेची शपथ देण्यात आली.
इंटेरिअर डिझाईन विभागाच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वैभवी इंगळे हिने महर्षी कर्वे यांची भूमिका साकारून एकांकिका सादर करून स्त्री शिक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका प्रणाली गौरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी वाणी यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.