ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मतदार राजा जागा हो!’ पथनाट्य प्रेरणादायक, अभयनंदन अंबास्था 

रासेयो स्वयंसेवकांनी पथनाट्यातून केली मतदार जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘पथनाट्यासारख्या उपक्रमातून मतदारांना आपल्या अमूल्य मताचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून रासेयो स्वयंसेवक व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी सादर केलेले ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!’ हे पथनाट्य प्रेरणादायक आहे,’ असे प्रतिपादन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक अभयनंदन अंबास्था यांनी स्थानिक बसस्थानक येथे 11 एप्रिल रोजी पथनाट्यातील कलाकारांसोबत संवाद साधताना केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका पवार, तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त प्रा. मोहन गुजरकर, गट शिक्षणाधिकारी राजेश रेवतकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, बंडू पेटकर, मनोज वंजारी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

‘मतदार राजा जागा हो..’ या पथनाटयातून स्वयंसेवकांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की आपला लोक प्रतिनिधी निवडताना त्यांची जात, धर्म, पक्ष व पैसा याकडे न पाहता तो सक्षम व योग्य नेतृत्व प्रदान करणारा असावा यावर भर द्या व आपली लोकशाही बळकट करण्याचा संदेश दिला. उपस्थितीतांनी पथनाटयातील कलाकारांचे कौतुक केले.

सदर पथनाट्य स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व रोव्हर-रेंजर पथकाने सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेंजर वैष्णवी शिरभाते, पायल चौके, कोमल शितळे, आकाश कन्नाके, अस्मिता दडांजे, सुजल पराते, निशांत शितळे, समिक्षा मराठे, रितेश बुटे, साक्षी येळणे, आदर्श नाईक, मनोज नेहारे, आदित्य तामगाडगे व देवीका मगरे यांनी पथनाटयात कलाकार म्हणून उत्तम भूमीका सादर केली. सदर चमू देवळी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मतदारांमध्ये जनजागृती करीत आहेत.

नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी प्रशासनाच्या वतीने उपस्थितीतांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये