तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक स्थगित करा
मतदार यादी प्रचंड घोळ ; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका शेतकी खरेदी विक्री सह.संस्थाच्या संचालक निवडणुकीचा पंचवार्षिक कार्यक्रम जाहीर झाला असून, संस्थेच्या सभासदांनी नामनिर्देशन अर्ज भरले आहेत. निवडणुकीच्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याने निवडणूक व मतदानापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सदर प्रसिद्ध करण्यात आलेली निवडणूक यादी रद्द करून होऊ घातलेल्या निवडणुकीला तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,देऊळगाव राजा तालुका शेतकी खरेदी विक्री सह.संस्था मर्या. दे. राजा र. न.612, तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा च्या संचालक मंडळ निवडणुकीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सन 2024 ते 2029 जाहीर झाला असून, सदर निवडणुकांचा प्रक्रिया कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज देखील सादर केले आहे. मात्र संस्थेमार्फत जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या मतदार यादीत 2600 ते 2700 मतदार अपुरे शेअरचे कारण दाखवून वगळण्यात आले आहे.
सदर मतदारांना किंवा सभासदांना शेअर्स भरण्यासाठी प्रतीक्षात संस्थेमार्फत नोटीस बजावण्यात आली नाही. शिवाय ग्रामीण भागातील गावांमध्ये दवंडी देखील देण्यात आली नाही. सभासदांना शेअर भरण्यासाठी फक्त एका वृत्तपत्रातून आवाहन करण्यात आले होते. सदर वृत्तपत्र हे ग्रामीण भागात पोहोचली नाही. त्यामुळे अशा सभासदांना याबद्दल माहिती मिळू शकली नाही. तालुक्यातील देऊळगाव मही सारख्या मोठ्या गावामध्ये फक्त चार मतं व पांगरी सारख्या गावामध्ये फक्त तीन मते यादीमध्ये दाखवण्यात आली आहे. शिवाय पुर्णा नदीच्या पलीकडे फक्त 61 मते दाखवण्यात आली आहे. मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना देखील कोणत्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नाही.
प्रशासक आणि व्यवस्थापक यांनी संगणमत करून काही राजकीय लोकांच्या दबावाखाली आपल्या सोयीनुसार सदर मतदार यादी तयार केली आहे. हा प्रकार लोकशाहीला घातक आहे. तसेच अनेक सभासदांनी शेअर्स भरले असून देखील त्यांचे मतदार यादीत नाव आले नाही. शेअर्स भरल्याबाबत अशा सभासदांकडे पावती देखील उपलब्ध आहे.प्रशासक व व्यवस्थापक यांनी अपुरे शेअर्सच्या नावाखाली हजारो सभासदांना होणाऱ्या या निवडणुकीपासून व मतदानापासून वंचित ठेवले आहे. या प्रकारास सर्वस्वी प्रशासक व व्यवस्थापक जबाबदार असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. व सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली निवडणूक मतदार यादी रद्द करून फेर सुधारित मतदार यादी तयार करावी.
तोपर्यंत सदर निवडणूक कार्यक्रम तात्काळ दोन दिवसात स्थगित करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यप्रणालीच्या विरोधात तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,सचिव जहीर पठाण,उपाध्यक्ष सुरेश कोल्हे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, शंकर वाघमारे,आजमत खान,मुबारक चाऊस,अमोल उदयपूरकर,असलम खान,सचिन कोल्हे,साजिद खान, रावसाहेब गाडवे, भानदास कणखर आदींनी दिला आहे.