“गो.ग्रीन..टुगेदर..!” उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे सीईओ पूलकित सिंह यांचे आवाहन
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने “गो ग्रीन टुगेदर” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिह यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार ऊर्जा बचत, संसाधन संवर्धन व पर्यावरण संरक्षण या उद्देशाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक, कार-पूलिंग, सायकल तसेच विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच क्षेत्रभेटी व कार्यालयीन दौरे एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.
कार्यालयीन कामकाजात नैसर्गिक प्रकाशाचा वापर, अनावश्यक वीज वापर टाळणे, वातानुकूलित यंत्रणा व इतर उपकरणांचा मर्यादित वापर करणे, तसेच बैठका व प्रशिक्षण कार्यक्रम शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
थेंब थेंब इंधनाची बचत करून स्वावलंबी भारत घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिह यांच्या हस्ते सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. स्वावलंबी भारत घडवण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक प्रवास पद्धती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना “हरित योगदान प्रणाली”द्वारे प्रोत्साहन देण्यात येणार असून, यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वापरावर विशेष भर देण्यात आला आहे. एकट्या व्यक्तीने पेट्रोल दुचाकीचा वापर केल्यास प्रतीदिन प्रतीप्रवेश रु. २०/- तर चारचाकी वाहन वापरल्यास प्रतीदिन प्रतीप्रवेश रु. २००/- योगदान द्यावे लागणार आहे. जमा होणारी रक्कम “जिल्हा परिषद चंद्रपूर हरित स्वावलंबन कोष” मध्ये जमा करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनाने सर्व विभाग प्रमुख व गट विकास अधिकाऱ्यांना या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणपूरक व जबाबदार प्रशासकीय कार्यसंस्कृती निर्माण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिह यांनी केले आहे.



