ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुर्यांश नवोन्मेष पुरस्काराने सुरज दहागावकर सन्मानित…

चांदा ब्लास्ट

    सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर यांच्याकडून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे रविवार, दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी उत्साहात पार पडला. यामध्ये युवा साहित्यिक, कवी, लेखक सुरज पी. दहागावकर यांना ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांच्या शुभहस्ते “सुर्यांश नवोन्मेष पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

चंद्रपुरातील सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्याकडून मागील १० वर्षांपासून राज्यभरातील साहित्यिकांकडून व प्रकाशकांकडून प्रकाशित विविध साहित्यकृतीच्या प्रवेशिका मागवल्या जातात आणि त्यातून पुरस्कार प्रदान केले जातात. सोबतच संस्थेकडून दरवर्षी एका नवोदित युवा साहित्यिकाला प्रोत्साहन देण्यासाठी स्व. मिलिंद बोरकर स्मृतीप्रित्यर्थ सुर्यांश नवोन्मेष पुरस्कार देण्यात येतो. २०२२ या वर्षाच्या नवोन्मेष पुरस्कारासाठी सुर्यांशकडून सुरज दहागावकर यांची निवड करून त्यांना गौरविण्यात आले.

सुरज हे युवा कवी आणि लेखक असून त्यांचे १५० हून अधिक विविध विषयावरील लेख आणि कविता महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आहेत. सोबतच सुरज विचारज्योत फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सुरज मूळचे चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकबापुर (सकमुर) गावाचे असून ते समाजकार्य शिक्षणात पदव्युत्तर आहे. ग्रामीण भागातून येऊन सुरज यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःच्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे हे विशेष. सुरज यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांना सुर्यांश नवोन्मेष पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, डॉ. राजीव देवईकर, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रसिद्ध कवी किशोर बळी, संजय वैद्य, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख, सचिव प्रदीप देशमुख, विद्याधर बन्सोड, यांच्यासह राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त सर्व पुरस्कार्थी, कवी, लेखक आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये