स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाची दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई
अवैध गावठी मोहा दारू वाहतूक व विक्रीप्रकरणी ४,५९,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा : स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथकाने पोलीस स्टेशन तळेगाव (शा.) हद्दीत अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत २४५ लिटर गावठी मोहा दारू, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार व मोबाईल असा एकूण ४,५९,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तळेगाव (शा.) पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची माहिती : पोलीस स्टेशन तळेगाव (शा.) येथे अप. क्र. ५३४/२०२६, कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच कलम ३(१), १८१ व १३०/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दि. १५/०६/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पथक तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी टी-पॉइंट येथील उड्डाणपुलाखाली सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपी नितीन मनोहर मोहळे व सौ. दिपाली नितीन मोहळे हे एका फिकट सोनेरी रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून गावठी मोहा दारूची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सात मोठ्या प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी ३५ लिटर प्रमाणे एकूण २४५ लिटर गावठी मोहा दारू आढळून आली. प्राथमिक चौकशीत सदर दारू रणवीर पवार, रा. भिवापूर, सारवाडी पारधी बेडा, ता. आष्टी, जि. वर्धा याच्याकडून विकत घेतल्याचे आरोपींनी सांगितल्याचे नमूद आहे. संबंधित आरोपी रणवीर पवार हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
जप्त मुद्देमाल : कारवाईदरम्यान २४५ लिटर गावठी मोहा दारू, सात प्लास्टिक कॅन, अंदाजे चार लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्र. MH-31-CN-3914) आणि आठ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ४,५९,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त दारूचा माल जागीच नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली असून, उर्वरित मुद्देमाल जप्ती पंचनाम्यानुसार ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पसार आरोपीचा शोध व गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, सफो खुशालपंत राठोड, पोहवा दीपक जंगले पो. अंमलदार रितेश कुऱ्हाडकर,मंगेश आदे, सुमित शेंदरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



