चंदनखेडा कृषी कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! : कार्यालय वारंवार बंद
अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय : शिवसेनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील कृषी मंडळ कार्यालय वारंवार बंद राहत असल्याने तसेच संबंधित अधिकारी मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांची तातडीने दखल घेऊन कार्यालय नियमित सुरू ठेवावे आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे युवानेते सुरज गोपाळ शहा यांनी तालुका कृषी अधिकारी सुशील आडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंदनखेडा हे भद्रावती तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असून, येथे काही वर्षांपूर्वी कृषी मंडळ कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत असून, वेळ आणि श्रम वाया जात आहेत.
राज्य शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कामे व माहिती जाणून घेण्याकरिता शेतकरी कार्यालयात जातात. मात्र, कार्यालय बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
तसेच, गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी यांसारखे शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांना आवश्यक कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर चंदनखेडा कृषी मंडळ कार्यालय नियमित सुरू ठेवावे, अधिकाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा निश्चित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवेदनातील समस्यांचे सात दिवसांच्या आत निराकरण करावे, अन्यथा शेतकरी व ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, चंद्रपूर आणि जिल्हा कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनाही देण्यात आल्या आहै.



