श्रीराम आदिवासी आश्रमशाळेत धाबा पोलिसांचा जनजागृतीचा जागर!
सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, बाललैंगिक अत्याचार आणि वाहतूक नियमांबाबत ३८० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाचे ज्ञान मिळावे आणि महिला सुरक्षा, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध व वाहतूक नियमांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने धाबा उपपोलीस स्टेशनच्या वतीने गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विविध शाळा-महाविद्यालयांतील सुमारे ३८० विद्यार्थ्यांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना केवळ कायद्यांची माहिती देण्यात आली नाही, तर दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे महत्त्व आणि संकटाच्या वेळी पोलिसांची मदत कशी घ्यावी, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढला असून, त्यासोबत सायबर फसवणुकीचे धोकेही वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधणे आणि वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या.
सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास घाबरून न जाता तातडीने संबंधित यंत्रणेकडे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले.
महिलांशी संबंधित गुन्हे, मुलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित स्पर्श, छळ किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास ते लपवून न ठेवता पालक, शिक्षक अथवा पोलिसांना सांगावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्यासोबतच इतरांच्या अडचणी समजून घेऊन योग्य वेळी मदतीसाठी पुढे यावे, यावरही भर देण्यात आला.
रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, वाहतुकीचे संकेत पाळणे आणि अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्यापासून दूर राहणे, याविषयी विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या.
यासोबतच नशामुक्त अभियानाचे महत्त्व पटवून देत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घेता येते, याचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमात चार शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
श्रीराम आदिवासी आश्रमशाळा, गोजोली, जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, धाबा,
नवजीवन महाविद्यालय, गोजोली, स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, किरमिरी अशा प्रकारे एकूण सुमारे ३८० विद्यार्थी आणि २० शिक्षकवृंद या उपक्रमात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
पोलिसांच्या पुढाकाराचे कौतुक
या कार्यक्रमाला धाबा उपपोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि विरेंद्र केदारे तसेच दामिनी पथक, चंद्रपूर येथील सपोनि प्रज्ञा वाडेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी धाबा येथील पोलीस कर्मचारी सफौ वासुदेव आत्राम, पोहवा जीवन आचेवार, पोअं धनराज सयाम, पोअं गजानन तुरेकर, मासूम मेश्राम आणि संबंधित शैक्षणिक संस्थांतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, गुन्हेगारीपासून त्यांचे संरक्षण करणे आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी त्यांना सजग नागरिक बनविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शालेय वयातच विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची माहिती मिळाल्यास भविष्यात ते अधिक जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून घडण्यास मदत होईल. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये अशा जनजागृती कार्यक्रमांचे नियमित आयोजन होणे आवश्यक आहे.



