ताज्या घडामोडी

अप्रतिष्टीत जीवनयात्रा संपविण्यासाठी पीडित आदिवासी महिलेने केले विष प्राशन

वरोरा पोलीस स्टेशनमधील घटना; महिला गंभीर, चंद्रपूरला हलविले

चांदा ब्लास्ट : *राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: विवाहित आदिवासी महिला प्रीती हिने काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचत न्यायाची अपेक्षा केली होती पण सदर प्रकरणात पोलीस आरोपींना अट्रॉसिटी ऍक्टनुसार अटक करीत नसल्याचा आरोप लावून सोमवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विष प्राशन करण्याचा इशारा दिला होता.
सदर आदिवासी महिलेच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन पोलिसांनी संबंधित आरोपी रिझवान शेख (वय ३२ वर्षे ), दानिश शेख (वय २७ वर्षे ) व मोहसीन शेख (वय २४ वर्षे ) यांना अटक केली होती. अन्य एक आरोपी मोहम्मद शेख (वय ६२वर्षे ) याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे पोलिसांनी अटक केली नव्हती. सदर आदिवासी महिलेच्या मागणीची पूर्तता झाल्यानंतर तिने आपल्या जीवाला काही अपाय करू नये, याबाबत सावधानता बाळगत पोलिसांनी तिला सोमवारी १२.०० वाजताच्या सुमारास वरोरा पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले होते. यावेळी चंद्रपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी व २ महिला अधिकारी यांच्यावतीने संबंधित महिलेचे समुपदेशनही सुरू होते. “आरोपींना ६ महिने जामीन मिळणार नाही याची गॅरंटी द्या ” , या मागणीवर ती अडून होती. तिच्या मागणी व कायद्यानुसार सर्व कार्यवाही झाली असल्याचे तिला पोलिसांकडून सांगितले गेले. यादरम्यान दुपारी ३.४५ वाजताच्या दरम्यान सदर महिलेने पाणी पिण्याच्या निमित्ताने सोबत आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्याल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिने विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तिला तात्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तिथे प्रथमोपचार झाल्यानंतर सदर महिलेला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. ही सर्व घटना पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यात कैद आहे. या प्रकरणात महिलेच्या मागणीनुसार व कायद्यानुसार आवश्यक कारवाई झाली आहे. पुढील कार्यवाहीसुद्धा कायद्यानुसार होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भा.पो.से.) यांनी पोलीस स्टेशन आवारात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
एकंदरीत सदर प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये