पेंढरी मक्ता येथील अतिक्रमणधारक लाभार्थी घरकुलापासून वंचित
नियमाला डावलून घरकुलाचा लाभ देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
पूर्वी शासकीय जागेत अतिक्रमणधारकांना घरकुलाचा लाभ दिलेला असतांना काही लाभार्थ्यांना त्याच जागेत घरकुल देण्यास पंचायत समिती सावली नाकारत असल्याने त्यांना घरकुलाचा लाभ देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना निवेदन देत करण्यात आले. अन्यथा शासकीय जागेत बेकायदेशीर घरकुल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथे वडहेटी नावाची टोली असून अनेक वर्षांपासून तिथे जवळपास साठ कुटुंब वस्ती करीत आहेत. त्या वस्तीत रस्ते, नाल्या, हातपम्प व पूर्ण विजेची सोय झालेली आहे. जवळपास ९० टक्के शासकीय घरकुल झालेले आहे. सर्व सुरळीत असतांना अचानक सन २०२२-२३ मध्ये ग्रामपंचायत गाव नमुना ८ रेकॉर्डला शासकीय जागा असल्याचा शेरा दर्शविण्यात आला आहे. त्यानंतरही नमुना ८ वर शासकीय जमीन असा उल्लेख असतांना सावली पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोले, जगन्नाथ तेलकापल्लीवार, मधुकर वासनिक व घरकुल विभागाचे अधिकारी यांनी घरकुलाचा लाभ दिला आहे.
काही गाव नमुना ८ रेकॉर्डवर शासकीय जमीन न दाखवता ग्रामपंचायत पेंढरीचे ग्रामसेवक कुरेकार यांनी घरकुलाचा लाभ दिलेला आहे. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतील महादेव केशव गेडाम, कमल नामदेव घोडाम, अरुण सावजी पेंदाम, तुळशीराम भरडकर, विजय दादाजी गंडाटे, अंबादास माणिकराव मडावी, प्रवीण गेडाम, नीलकंठ कोवे यांना शासकीय जागेचे कारण दाखवून घरकुलाचा लाभ नाकारण्यात येत आहे. गाव नमुना ८ वर असलेले शासकीय जमीन हा शेरा काढण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतने ठरावही पारीत केला आहे मात्र ग्रामसेवक या ठरावाला कराची टोपली दाखवत आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाची रक्कम जमा झाली व बांधकामाला सुरवात केली आहे मात्र त्यांना रक्कम न देण्यासही बँकेला पत्र दिले आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी भीतीच्या वातावरणात आहेत.
त्या वस्तीत सर्व शासकीय कामे झाले असतांना, यापूर्वी ८० टक्के शासकीय घरकुल बांधकामे झाले असतांना आता घरकुल न देणे म्हणजे या कुटुंबावर अन्याय करणे आहे. ज्या घरकुलधारक कुटुंबाकडे स्वतःची जागा नसेल त्यांना शासकीय जागा देण्याचे प्रयोजन परिपत्रकात आहे. मात्र सदर कुटुंबाकडे अतिक्रमित शासकीय जागा असतांना त्यांना घरकुलाचा लाभ देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. यापूर्वी शासकीय अतिक्रमित जागेवर घरकुलाचा लाभ दिलेला असतांना आता मात्र दुजाभाव सुरु असल्याने शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे घरकुलाचा लाभ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी तत्कालीन गटविकास अधिकारी योगेश गाडे यांचेकडे केली होती. पण अजूनपर्यंत काहीच झालेली नाही.
*पेंढरी मक्ता येथे अनेक वर्षांपासून वडहेटी ही वस्ती वसलेली असून या ठिकाणी अनेक घरकुलांचे बांधकाम झालेले आहे. मात्र अचानक काही घरकुलधारकांना शासकीय जागा असल्याचे कारण दर्शवून घरकुल देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यापूर्वी गाव नमुना ८ रेकॉर्डला शासकीय जागेची नोंद असतांना घरकुल दिलेले आहे व घरकुलसाठी शासकीय जागा देण्याची तरतूद असतांना प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने जे बेकायदेशीररित्या घरकुल दिले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी आहे. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार दखल करण्यात येणार आहे.
*विजय कोरेवार*
*माजी सभापती पंचायत समिती सावली.*