देऊळगाव राजा हायस्कूल मध्ये सायबर जनजागृती व दामिनी पथकाचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मोबाईलचा अयोग्य व बेजबाबदार वापर, वाढते सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक तसेच विद्यार्थिनींवरील छेडछाड व अत्याचार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 17 जुलै रोजी देऊळगाव राजा हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज येथे सायबर जनजागृती व दामिनी पथक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या प्रमुख काकडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, मोबाईलचा चुकीचा वापर, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी संपर्क, वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण यामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान, मानसिक ताण तसेच विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रवासादरम्यान किंवा दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास, छेडछाड अथवा अन्याय झाल्यास भीती न बाळगता त्वरित महिला हेल्पलाइन क्रमांक 1091, आपत्कालीन सेवा 112 किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाईन फसवणूक, बनावट लिंक,ओटीपी, सोशल मीडिया सुरक्षेचे नियम आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य .आर.बी. कोल्हे होते. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन, शालेय शिस्त आणि सुरक्षित व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पेरणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डी.व्ही. जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता आठवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, मोबाईलचा जबाबदारीने वापर आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण जनजागृती निर्माण झाली.



