ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीतील तरुणाची तब्बल १८.८८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

टेलिग्राम ॲपवरील ऑनलाइन टॉस्क : शेअर मार्केटच्या परताव्याचे दिले आमिष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती शहरात मोठ्या आर्थिक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली असून, जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय तरुणाची तब्बल १८ लाख ८८ हजार ५८८ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिंगुजी वॉर्ड येथील रहिवासी निखिल ऋषी बावणे (वय २९) हा चांदा आयुध निर्माणीच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर खासगी वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीकडून संदेश आला. त्यामध्ये काही कामे पूर्ण करून तसेच समभाग बाजारात परकीय चलनाद्वारे गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.

सुरुवातीला कमी रक्कम गुंतवल्यानंतर त्याला आभासी पद्धतीने मोठा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे विश्वास बसलेल्या निखिलने स्वतःच्या तसेच आईच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवण्यास सुरुवात केली. ३ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत त्याने ३५ व्यवहारांद्वारे एकूण १८ लाख ८८ हजार ५८८ रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले.

यानंतर नफा किंवा मूळ रक्कम परत घेण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. उलट खाते गोठविल्याचे सांगून आणखी पैसे भरण्याची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निखिल बावणे यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणात फसवणुकीतील २ लाख १० हजार १४० रुपये सध्या गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक योगेश्वर विठोबा पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कपिल भोयर पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सामाजिक माध्यमांवरून येणाऱ्या भरघोस नफा, गुंतवणूक किंवा सहज पैसे कमावण्याच्या आमिषांना बळी पडू नये, कोणतीही रक्कम पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये