ब्रम्हपुरीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; ओबीसी जनगणना कॉलमच्या मागणीसाठी निवेदन
विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत केलेल्या वाढीच्या निषेधार्थ तसेच जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याच्या मागणीसाठी ब्रम्हपुरी शहर काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र शासनाने मागील आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून महागाईत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी इंधनाची टंचाई जाणवत असून नागरिकांना आवश्यक प्रमाणात पेट्रोल व डिझेल उपलब्ध होत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. याबाबत केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर सुरू असलेल्या जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे या समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होणार नाही, परिणामी ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली.
यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते-आमदार विजय वडेट्टीवार, माजी प्राचार्य डॉ.नामदेव कोकोडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, नगराध्यक्ष योगेश मिसार, न.प.उपाध्यक्ष डॉ.नितीन उराडे, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, प्रदेश सचिव डॉ.थानेश्वर कायरकर यांच्यासह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, नगर परिषदेचे नगरसेवक-नगरसेविका, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विविध फ्रंटल ऑर्गनायझेशन व सेलचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.



