अवैध दारू विक्रीच्या वादातून विक्रेत्यावर हल्ला
सात जणांविरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मांगली येथे अवैध दारू विक्रीच्या वादातून एका विक्रेत्यावर सात जणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी सात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मांगली परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. चार दिवसांपूर्वी एका अवैध दारू पुरवठादाराने संबंधित विक्रेत्याला “माझ्याकडूनच दारू घे, दुसऱ्याकडून खरेदी करू नको,” अशी धमकी दिली होती. या वादातूनच बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली.
संबंधित अवैध दारू विक्रेता मांगली येथून पिर्लीकडे जात असताना एका कारमधून सात जण खाली उतरले. त्यांनी जुन्या वादाची आठवण करून देत त्याच्यावर हाताच्या बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. यावेळी आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली. विशेष म्हणजे, हल्ल्यादरम्यान काही आरोपींनी संपूर्ण घटनेचा मोबाईलवर व्हिडिओदेखील तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी धिरज वराठकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य कांबळे, अक्षय मन्ने, सुरज मन्ने, पिंटू मरसकोल्हे, विक्की लाडूकर, समीर बोरकर, अमृत बावने यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), १९१(२), १९१(३), १८९(२), १८९(४), १९०, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.



