देऊळगाव राजात पाणीपुरवठा योजनेतील पाईप चोरी
अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा: : शहरातील त्र्यंबकनगर ते पिंपळनेर मार्गावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामादरम्यान जुन्या पाईपलाइनचे तुकडे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पाईपची किंमत सुमारे १४ हजार ५२० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देऊळगाव राजा शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा कार्यादेश नाशिक येथील मे. पी. एल. आडके यांना नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला असून, पिंपळनेर ते त्र्यंबकनगर रोडलगत नवीन पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.या कामादरम्यान जुन्या डी.आय. पाईपलाइनच्या ठिकाणी चर (ट्रेंच) खोदकाम करण्यात आले असता, जुनी पाईपलाइन तुटून तिचे तुकडे बाहेर निघाले होते. संबंधित काम ६ मेपासून सुरू झाले असून ९ मे रोजी पाईपचे तुकडे बाहेर काढण्यात आले. मात्र, १३ मे रोजी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान सुमारे २० मीटर लांबीचे प्लास्टिक पाईपचे तुकडे अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी देऊळगाव राजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अरुण मोकळ यांच्या वतीने पाणीपुरवठा अभियंता श्रीमती विजया शिंगणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अपराध क्रमांक २२०/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुसा करीत असून, चोरीस गेलेल्या साहित्याचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचाली, स्थानिक माहिती तसेच इतर पुरावे तपासले जात आहेत. शहरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांमधून साहित्य चोरी होण्याच्या घटना प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.



