ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

सावली तालुक्यातील सादागड परिसरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 प्राथमिक उपचारानंतर गडचिरोलीला हलविले

सावली तालुक्यातील सादागड परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात एका महिलेवर गंभीर जखमी होण्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. गयाबाई शिवाजी मडावी (वय ६० वर्षे) रा. सादागड या रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरात गेल्या असता अचानक अस्वल वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा आवाज ऐकताच अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर जखमी महिलेला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली. सादागड परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

दरम्यान, वाढत्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे।

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये