स्कार्पिओच्या धडकेत पोलीस हवालदार जखमी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ रस्त्यावरील बेशिस्त आणि मद्यधुंद वाहनचालकांमुळे निष्पाप जीवांना अपघाताचा फटका बसण्याचे सत्र सुरूच आहे. ब्रम्हपुरी ते आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने पोलीस हवालदाराच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार कृनाल भाऊराव हेमके (वय ४५ वर्ष) हे रविवारी, १२ एप्रिल रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्रमांक MH 33 Z 1776) आरमोरीकडे जात होते. ते वैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने (क्रमांक MH 34 KR 7982) त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादीनुसार, स्कॉर्पिओ चालक दारूच्या नशेत होता. तो आपले वाहन अत्यंत भरधाव वेगाने आणि नागमोडी (वाकडे-तिकडे) चालवत होता. या निष्काळजीपणामुळेच त्याने हवालदार हेमके यांच्या दुचाकीला समोरून धडक मारली. या धडकेत हेमके यांच्या शरीराला गंभीर इजा झाली. असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी जखमी हवालदाराच्या पत्नी सौ. भावना कृनाल हेमके यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात आणि ब्रम्हपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.



