राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा होणार कायापालट!
आमदार देवराव भोंगळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४५ लक्ष रुपये मंजूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राजुरा शहरातील मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे आता नूतनीकरण होऊन सौंदर्यीकरण केले जाणार आहे. स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी ४५ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर केला असून, लवकरच या परिसराचा कायापालट केला जाणार आहे.
शहरात आगमन होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयाजवळ शिवरायांचा भव्य पुतळा लक्ष वेधून घेतो. या परिसराचे महत्त्व आणि शिवप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या भागाच्या सौंदर्यीकरणाची गरज ओळखत आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने पावले उचलली. त्यानुसार ४५ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या प्रेरणास्थळाचे दर्शन घडते. या परिसराचे पावित्र्य राखून त्याचे सौंदर्यीकरण करणे, हे माझे कर्तव्य आहे. राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
*- देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा*
या सौंदर्यीकरणामुळे राजुरा शहराच्या वैभवात भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः शिवप्रेमींनी आमदार देवराव भोंगळे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.



