ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीतील “त्या” अवैद्य मुरुम प्रकरणाची होणार चौकशी

१०० ब्रासची परवानगी, उपसा ६०० ब्रास  ; तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपीपरी तालुक्यातील व्यंकटपूर परिसरात गौण खनिजाचा अक्षरशः बाजार मांडणाऱ्या मुरुम माफियांवर आता प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आली आहे. केवळ १०० ब्रासची परवानगी असताना तब्बल ६०० ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे अवैध मुरूम तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

व्यंकटपूर येथील सर्वे क्र. १६२ मध्ये भालचंद्र बोधलकर यांना शासनाकडून केवळ १०० ब्रास मुरुम उत्खननाची रितसर परवानगी देण्यात आली होती. मात्र, नियमांना धाब्यावर बसवून या ठिकाणी प्रत्यक्ष ५०० ते ६०० ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. विशेष म्हणजे, महसूल विभागाची दिशाभूल करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणचे रॉयल्टी पास वापरून या मालाची वाहतूक केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

*राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा*

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभागाने या मुरूम तस्करी विरोधात आवाज उठवला. त्यांनी पुराव्यासह तहसीलदार कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले. केवळ मुरुमच नव्हे, तर या भागात मोठ्या प्रमाणात रेती आणि विटांचा साठाही अवैधपणे करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अवैध व्यवहारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे.

*तहसीलदारांचे चौकशीचे आदेश*

अवैद्य मुरूम तस्करीचे गांभीर्य ओळखून गोंडपिपरी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्खनन केलेल्या क्षेत्राची मोजणी करून परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाले आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध मुरुम आणि रेती माफियांच्या गोटात खळबळबळ उडाली आहे. आता महसूल विभाग या दोषींवर नेमकी काय कठोर कारवाई करतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये