गुंजन पिंपळकरला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात
स्व. श्रीनिवास शिंदे चॅरिटेबल ट्रस्टची सामाजिक बांधीलकी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांच्या उत्थानासाठी सदैव तत्पर असलेल्या ‘स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’ने आपल्या सामाजिक कार्याचा ओघ कायम राखला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत भद्रावती येथील कुमारी गुंजन प्रदीप पिंपळकर हिच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे एका गरजू विद्यार्थिनीला पुन्हा दृष्टी आणि नवीन उमेद मिळाली आहे.
कुमारी गुंजन पिंपळकर ही ट्रस्टची शैक्षणिक दत्तक विद्यार्थिनी असून ती सध्या दहावीत शिकत आहे. डोळ्यांच्या वाढत्या त्रासामुळे तिला अभ्यासात अडचणी येत होत्या आणि डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहता शस्त्रक्रियेचा खर्च पेलणे अशक्य असल्याने तिच्या आईने ट्रस्टकडे मदतीची याचना केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने निधी मंजूर करण्यात आला. ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे यांच्या हस्ते शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहकार्याचा धनादेश गुंजनच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल ट्रस्टने आजवर आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून हजारो सामान्य नागरिकांचे आयुष्य सुसह्य केले आहे. केवळ आरोग्यच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही ट्रस्टचा मोठा दबदबा आहे. गरीब आणि निराधार पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ‘शैक्षणिक दत्तक’ घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण भार ट्रस्ट उचलत आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना या माध्यमातून उच्च शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. याशिवाय, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देणे, दिव्यांगांना मोफत तीनचाकी सायकलींचे वाटप करून त्यांना स्वावलंबी बनवणे, अशा उपक्रमांतून ट्रस्टने चंद्रपूर जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आरोग्य अभियानांतर्गत अनेक गंभीर आजारांच्या रुग्णांनाही ट्रस्टने वेळोवेळी लाखांची मदत मिळवून दिली आहे. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,” या भावनेतून ट्रस्टचे कार्य अविरत सुरू आहे. गुंजनला मिळालेल्या या मदतीमुळे तिच्या आईने भावूक होऊन ट्रस्टचे आभार मानले. “संकटाच्या काळात ट्रस्ट आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, हे आमच्यासाठी खूप मोठे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या मदतीमुळे गुंजन आता पुन्हा जिद्दीने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकणार आहे.



