विद्यार्थ्यांसाठी संगणक संच व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय
आमदार अडबाले यांच्या स्थानिक विकास निधीतून

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात तसेच शाळांमध्ये मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कोरपना तालुक्यातील पारडी येथील प्रियदर्शनी विद्यालयात संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
तसेच कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच माथा येथील श्री शिवाजी विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी आरो फिल्टर मशीन बसविण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ही सर्व सुविधा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आभार मानले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.



