खुटाळा येथे जिल्हास्तरीय ‘आमदार चषक’ कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरणाने समारोप
३५ संघांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच दत्तकृष्ण बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर यांच्या माध्यमातून २८ व २९ मार्च २०२६ रोजी खुटाळा येथील दत्त मंदिरासमोरील पटांगणावर ‘आमदार चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३५ संघांनी सहभाग नोंदविला.
त्यापैकी २५ पुरुष संघ आणि १० महिला संघांचा समावेश होता. स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे झाले असून, खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेची सांगता २९ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. पुरुषांच्या ५७ किलो गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ, चंद्रपूर या संघाने विजेतेपद पटकावले, तर मराठा वॉरियर्स, कोंढा (ता. भद्रावती) संघ उपविजेता ठरला. तसेच ६५ किलो गटात श्री माता महाकाली क्रीडा मंडळ, चंद्रपूर संघ विजेता ठरला, तर वंदे मातरम क्रीडा मंडळ, खुटाळा संघाने उपविजेतेपद मिळवले.
महिला गटात ५५ किलो विभागात श्री माता महाकाली क्रीडा मंडळ, चंद्रपूर या संघाने विजेतेपद पटकावले, तर वंदे मातरम क्रीडा मंडळ, खुटाळा संघ उपविजेता ठरला. तसेच महिलांच्या खुल्या गटात आदर्श क्रीडा मंडळ, चंद्रपूर संघ विजेता ठरला, तर जय भवानी क्रीडा मंडळ, ढोरवासा (ता. भद्रावती) संघाने उपविजेतेपद मिळवले.
ही दोन दिवसीय स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सर्व सहभागी संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. बक्षीस वितरण सोहळ्याने सदर स्पर्धेचा समारोप करण्यात आला.



