वरोराचा शाश्वत धारणकर राष्ट्रीय पातळीवर झळकला
भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या सराव शिबिरासाठी निवड
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा.
वरोरा : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोकशिक्षण संस्था, वरोरा यांचा होतकरू खेळाडू शाश्वत शंकर धारणकर याची अहमदाबाद येथे होणाऱ्या एशियन व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय संभाव्य संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली आहे. हे शिबिर २५ मार्चपासून अहमदाबाद येथे सुरू होणार असून, शाश्वतसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड होणारा शाश्वत हा चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. सध्या तो चेन्नई येथील एसआरएम विद्यापीठात शिक्षण घेत असून, खेळ व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत तो उल्लेखनीय प्रगती करत आहे.
शाश्वतच्या या यशामुळे वरोरा शहरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे, आश्रयदाते मानस धानोरकर, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील तसेच सचिव विरल शहा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
आपल्या या यशाचे श्रेय शाश्वतने मार्गदर्शक सुनील बांगडे, निखिल बोबडे, देवानंद डुकरे, संजय अंबुलकर, गणेश मुसळे, दुष्यंत लांडगे तसेच वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन व लोकशिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.



