केपीसीएल कोळसा खाणीत कामबंद आंदोलन
पोलिसांकडून दबाव तंत्राचा आरोप : ठिय्या आंदोलन सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) कोळसा खाणीत काम करणाऱ्या उलगुलान कामगार संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. २४) कामबंद आंदोलन करण्यात आले. वेतन व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात निर्णय न घेतल्याने कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. यावेळी कंपनी प्रशासनाने दबाव तंत्राचा वापर करून पोलिसांना पाचारण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, दि. १२/०१/२०२६ रोजी दिलेल्या मांगपत्रावर कायदेशीर पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर दि. २७/०१/२०२६ रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी व मा. एस.डी.पी.ओ. वरोरा यांच्या मध्यस्थीने १५ दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेऊन वेतन व इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या कालावधीत बैठक न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
मंगळवारी सकाळी कामगारांनी शांततापूर्ण पद्धतीने कामबंद आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने वाहनात बसवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेने केला. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशन परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, न्याय्य मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात अरविंद देवगडे, सुभाष मेश्राम, सुरेंद्र गुप्ता, विनोद आगलावे, निलेश रामटेके, पांडूरंग सातपुते, शंकर बाळपणे, जया कोरडे, अश्विनी उईके, घनश्याम धाबेकर, विलास ताजणे, आशिष झंझाड, मनीषा येडमे, शैलेश शेंडे यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले आहेत.
परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.



