
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा तालुक्यांतील शेतकऱ्यांना क्रिस्टल सीड, न्यूजिवुड सीड, गंगा कावेरी सीड कंपनीने कॉटन सीड चे प्लॉट प्रतिनिधी मार्फत दिले होते. शेतकऱ्यांनी प्लॉट ची लागवड करून ठिंबक, खते, रोजदारी या समवेत अंदाजे 50 हजार रुपये खर्च केले आहे. आता कंपनी चे प्रतिनिधी यांनी संबधित शेतकऱ्यांना फोन करून प्लॉट उपटून टाका असे सांगितले आहे, त्यामूळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून कंपनीने शेतकऱ्यांना खर्च झालेला 50 हजार रुपये द्यावा, तसेच कंपनी व प्रतिनिधी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर हजारो शेतकरी कृषी कार्यालयासमोर आंदोलन करतील असे नमुद केले आहे, निवेदनावर सचिन मांटे यांच्या सह इतर शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.