प्रेरणा महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- दरवर्षी २१ जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे देखील मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “योग हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून तो केवळ व्यायाम नसून एक संपूर्ण जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो.” कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.योग दिनानिमित्य विध्यार्थ्यानी विविध योगासने जसे ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन आणि सूर्यनमस्कार केले.यावेळी विध्यार्थ्यांना प्रत्येक आसनाचे फायदे आणि योग्य पद्धती स्पष्ट करून सांगण्यात आल्या यासोबत प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती व ध्यान यांचे प्रात्यक्षिक करून सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रत्येक आसन नीट करून पाहण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की नियमित योगामुळे त्यांच्या अभ्यासात एकाग्रता वाढली आहे आणि थकवा कमी वाटतो.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्यांनी सर्वांना योग नियमितपणे करण्याचे आवाहन करून धन्यवाद दिले.या प्रसंगी अरविंद मुसने,प्रा.प्रवीण आंबटकर, प्रा. कुबलकर, प्रा. कुंजम शेंडे, प्रतीक मून,अर्चना मुठ्ठलवार यांची उपस्थिती होती.उपक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्याचा संकल्प केला.