घुग्घुस ग्रामीण रुग्णालय मागील रस्ता व नाली तातडीने तयार करण्याची मागणी
राजुरेड्डी यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेला रस्ता अत्यंत मोडकळीस आलेला असून या मार्गावरून वाहतूक करणे पूर्णतः अशक्य झाले आहे. या मार्गावरच पशुवैद्यकीय रुग्णालय देखील असून जनावरांना उपचारासाठी नेणे देखील कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष राजुरेड्डी यांनी तातडीने या रस्त्याचे दुरुस्ती आणि नालीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन सादर करत सांगितले की, रस्ता निकृष्ट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शिवाय, रस्त्यालगत नाली नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ साचत आहे, ज्यामुळे भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच, लॉयड्स कंपनीने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवले आहेत, जे अत्यंत उंच असून यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा रस्ता वॉर्ड क्रमांक 06 मधील नागरिकांचा प्रमुख मार्ग असल्याने, या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटकरण करून योग्य नालीची व्यवस्था करावी व धोकादायक गतिरोधकांचे दुरुस्ती करावी, अशी मागणी राजुरेड्डी यांनी केली आहे.
नगरपरिषदेने याकडे तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.