विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन : उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर (प्रतिनिधी) – गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. प्रफुल्ल माहुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या “इंग्रजी भाषेच्या कौशल्यविकासासाठी मार्गदर्शक पुस्तक” या पुस्तकाचे प्रकाशन.
या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अनिलराव चिताडे, संस्थेचे सचिव श्री. धनंजय गोरे, संचालक श्री. राहुल बोढे, श्री. रामचंद्र सोनपितरे, मुख्याध्यापक श्री. साईनाथ मेश्राम यांचा समावेश होता.
उपप्राचार्य माहुरे सरांनी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या अडचणी लक्षात घेऊन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल अशा सोप्या भाषेतील वाचन आणि संभाषण कौशल्य विकसित करणाऱ्या दैनंदिन विषयावर आधारित पुस्तक प्रकाशित केले. ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात आले.
या उपक्रमाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. प्रशांत धाबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. नरसिंह पांचाळ यांनी केले.
उपप्राचार्य श्री. माहुरे यांचे हे कार्य विद्यार्थ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.