कोलारीत युवकाचा संशयास्पद मृत्यू – हत्या की आत्महत्या?
भावाला जीवे मारण्याच्या धमक्या; कुटुंबाने मागितली न्याय्य चौकशी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोलारी येथे २५ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत युवक अमित तुपटे याचा मृतदेह ६ मार्च २०२५ रोजी विहिरीत आढळून आला. कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, मृताची सापडलेली चिठ्ठी आणि त्याच्या भावाला मिळालेल्या धमक्या या घटनेला अधिक गूढ बनवत आहेत.
अमित तुपटे २८ फेब्रुवारी रोजी रात्री १.३० वाजता दरम्यान घराबाहेर पडला होता अस सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या बेपत्ताची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. मात्र, ६ मार्च रोजी त्याचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळला. त्यानंतर शवविच्छेदन केल्याचे सांगण्यात आले, पण कुटुंबीयांनी आरोप केला की, योग्य प्रकारे विसेरा गोळा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
या घटनेनंतर अमितचा मोठा भाऊ राकेश तुपटे याला ११ आणि १४ मार्च रोजी धमक्या मिळाल्या. ११ मार्च रोजी शेतातून घरी येताना सचिन आबाजी मेश्राम, भैय्याजी चौखोबा मेश्राम आणि निखील भजन रामटेके या तिघांनी त्याला रस्त्यात अडवले आणि “तुझ्या भावाचे हाड तरी दिसले, तुझे हाडसुद्धा दिसणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर १४ मार्च रोजी त्याला परत धमकावण्यात आले आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला.
हत्या की आत्महत्या?
मृताच्या सापडलेल्या चिठ्ठीत अमितने गावातील एका मुलीवर प्रेम आहे म्हणुन मरत आहे. असे लिहिले होते. शिवाय, राकेश तुपटे यांना मिळालेल्या धमक्यांमुळे संशय अधिक गडद झाला आहे. गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनाच्या पुनर्तपासणीची मागणी करत उपविभागीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. तसेच आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्याकडेही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना सरपंच सौ. कांचन तुपटे, नरेश चौधरी, सुरेश तुपटे, अविनाश तुपटे, सोमेश्वर तुपटे, रमेश तुपटे, राहुल आंबोने, राकेश बावणे, गणेश नागमोती, योगेश तुपटे, सुरज शिलार आदी उपस्थित होते.
या घटनेचा तपास पोलिस कसोशीने करत आहेत का, हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या संशयास्पद मृत्यूमागे खरोखरच कट आहे का, हे पोलिस तपासातून लवकरच स्पष्ट होईल.