एस.आर.दळवी फाऊंडेशन तर्फे विदर्भाच्या काशीत प्लास्टिकमुक्ती जनजागृती
महाशिवरात्री यात्रेनिमित्य मार्कंडा येथे दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान हे भगवान शिवाचे लोकप्रसिद्ध देवस्थान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मिनी खजुराहो म्हणून तर विदर्भात काशी म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी उत्तरवाहिनी वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र असल्याने ह्या स्थळाला विशेष महत्व आहे. महाशिवरात्री मार्कंडा येथे दुरदुरून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांच्याकडून प्लास्टिकचा अतिवापर केल्या जातो. प्लास्टिकचा वापर तर घातकच पण भाविकांकडून त्याची योग्य विल्हेवाटही लावली जात नाही. इकडे तिकडे टाकून दिलेल्या कचऱ्यामुळे यात्रेनंतर पवित्र नदीचे पाणी सुद्धा दुषित होते. यासाठी प्लास्टिकचे दुष्परिणाम नागरिकांना समजून प्लास्टिकचा वापर टाळावा व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे या दृष्टीने एस. आर. दळवी फाऊंडेशन तर्फे रॅली काढून, नदीपात्रालगत बँनर घोषवाक्यासह प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान येथे दि.२६ फेब्रुवारी २०२५ ला एस.आर.दळवी फाँडेशन तर्फे महाशिवरात्री यात्रेनिमित्त प्लॅस्टिक मुक्ती जनजागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला एस.आर. दळवी फाऊंडेशन जिल्हा अध्यक्ष विजया पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुचरिता काळे, उपाध्यक्ष संदीप कोंडेकर, सहसचिव अंजेलीना साळवे, सदस्य ज्योती गावंडे, पुष्पा आडे, सुधीर झाडे, दिपक भोपळे व कल्पना बावणे ह्यांचेसह जि. प. उच्च प्राथमिक शाळा सिनाळाचे विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले व स्तूत्य उपक्रम म्हणून प्रशंसा केली. एस. आर. दळवी फाऊंडेशन तर्फे असेच सामाजिक उपक्रम राबविले जात असून शिक्षण व पर्यावरणावर जास्त भर देण्यात येतो.यापुढेही आम्ही प्लास्टिक मुक्ती साठी सातत्याने पाठपुरावा करत राहू असे प्रतिपादन सुचरिता काळे यांनी व्यक्त केले.